दशावतार: कोकणची एक समृद्ध लोककला

खानोलकर दशावतार नाट्य मंडळाच्या "हर्षली अयोध्या नगरी" या नाटकातील क्षण
खानोलकर दशावतार नाट्य मंडळाच्या “हर्षली अयोध्या नगरी” या नाटकातील एक क्षण | Source: रात्र दशावताराची’s Facebook Page

“दशावतार शब्द ऐकला की झोप लगेच उडून जाते,
रात्रीच्या राजाचा दरबार बघून मन आनंदाने भरून येते.”

– दिक्षा दिनेश मराळ

खरंच, किती छान आहेत या काव्यपंक्ती…. अगदी दोन ओळींमध्ये दशावताराचं स्वरूप दिसतंय. दशावतारी नाटक मूलतः रुजले, वाढले आणि फोफावले ते कोकणात. खरंच, कोकणी माणुस हा दशावतारी नाटक पाहण्यासाठी फार हौशी असतो आणि हल्लीतर शहरांकडे राहणारे लोक सुद्धा दशावतार नाट्य प्रेमी होऊ लागले आहेत. दक्षिण कोकणच्या संस्कृती व परंपरांच जतन करणारी कला म्हणजेच “दशावतार कला” होय. आपल्या या समृद्ध दशावतारी कलेने आत्तापर्यंत फारच प्रदीर्घ व प्रगतशील असा प्रवास केला आहे. म्हणूनच आज ही कला सातासमुद्रापार पोहोचली आहे.

दशावतार म्हणजे काय ?

दशावतार म्हणजे थोडक्यात सांगायचं झाल्यास भगवान श्रीकृष्णांनी घेतलेल्या अनेक अवतारांपैकी मुख्य दहा अवतार. ते अवतार म्हणजे मस्त्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण, बुद्ध आणि कल्कि अवतार हे आहेत. यामधील कल्की अवतार हा कालियुगाच्या अखेरीस श्रावण शुद्ध षष्टीच्या दिवशी होणार आहे असे कल्की पुराणात सांगितले आहे. परंतू दहा अवतारांमध्ये याचा उल्लेख केला जातो.

DASHAVATAR - TEN INCARNATIONS OF LORD VISHNU
श्रीहरीच्या अनेक अवतरांपैकी मुख्य दहा अवतार
Source: https://www.dollsofindia.com

दशावतारी नाटक असे या नाट्यप्रकरला म्हणत असले तरी आजही कोकणात पहिल्या आठ म्हणजेच मत्स्यावतारापासून ते कृष्णावतारापर्यंत आठ अवतारांना आळविण्यात येते. शेवटचे दोन अवतार म्हणजे बुद्ध आणि कल्की या अवतारांना तसे कथा निरुपणात आणि नाट्याविष्कारात पूर्वी आणि आजही स्थान दिलेले दिसत नाही.

दशावताराचा उगम

दशावतारी नाटक हे कोंकणी रसिकांचे सर्वात मोठे लोकरंजनाचे साधन आहे. हे मूलतः वेंगुर्ले व त्याच्या आसपासच्या गावात जन्माला आले आणि आजूबाजूला पसरले. आजही कोकणात असलेल्या सर्व प्रमुख दशावतारी नाटक मंडळ्या ह्या वेंगुर्ल्यात आहेत. तसेच आजही वेंगुर्ल्यातील पार्सेकर, मामा मोचेमाडकर, नाईक मोचेमाडकर, आरोलकर, आजगावकर ह्याच दशावतारी नाटक मंडळ्या गोव्यात जाऊन नाटके सादर करतात. ही परंपरा आज शेकडो वर्षे अविरथ चालू आहे. त्यामुळे गोमंतकातील दशावतार हा स्वतंत्र नसून तो कोकणातूनच गोव्याकडे लोकप्रिय ठरला आहे.

an orange and yellow decorated Dashavtar Petara with Lord Ganesh Mukhavta in it.
दशावताराची खरी ओळख म्हणजे सकल कलांचा अधिपती गणरायाचा मुखवटा असलेला पेटारा | Source: www.facebook.com

बऱ्याच जाणकारांचे सांगणे आहे की दशावतार यक्षगानातून कोकणात आला आहे. पण नावाप्रमाणे यक्षगान ही गानशैली आहे, नाटकशैली नाही. आणि दशावतारी नाटक ही नाट्य आहे, गानशैली नाही. त्यामुळे नाटकाची परंपरा ही नाटकातूनच जन्माला येऊ शकते गाण्यातून नव्हे. तसेच  कोकणातील दशावताराचे आजचे स्वरूप हे दहाव्या-बाराव्या शतकातील असून कानडी यक्षगान या गानशैलीचे “यक्षगान-आठा” हे स्वरूप पंधराव्या-सोळाव्या शतकातील आहे. त्यामुळे दशावताराने यक्षगानातून उसनवारी केलेली नाही हे निच्छित आहे.

पूर्वी जसे दशावतारी नाटक संपूर्ण कोकणात प्रसिद्ध होते व सुगीच्या हंगामानंतर त्याचे प्रयोग केले जात असत, तसेच आजही होताना दिसतात. प्राचीन दशावतारी नाटकात बहुतेक पात्रे मुखवटे धारण करीत असत. त्यात रावणाचा नऊ लाकडी शिरांचा मुखवटा फारच भव्य असे. शिवाय मत्स्यावताराचा मुखवटा, कूर्मावताराचा मुखवटा, शूर्पणखा, भूतेखेते, म्हातारी यांचे मुखवटे, हरिण, वाघ, घोडे, सिंह, हत्ती, बैल यांचे मुखवटे व त्याच बरोबर कुंभकर्णाचा प्रचंड मुखवटा असे. आज फक्त गणपतीचा मुखवटा, मोराचे मुख, संकासुराचा कापडी मुखवटा एवढेच मुखवटे परंपरेची जपणूक करत राहिलेले आहेत. 

दशावतारी नाटकाचे पूर्वरंग आणि उत्तररंग

दशावतारी नाटकाचे पूर्वरंग आणि उत्तररंग असे दोन भाग आहेत. नाटकाचा पूर्वरंग संगीतप्रधान आणि क्वचित नृत्यप्रधान असला तरी उत्तररंगात युद्धनृत्याला आणि वीररस प्रकट करण्याऱ्या संगीताला विशेष प्राधान्य मिळालेले आहे. पूर्वरंगात भक्तिरसातून ईश्वराची आळवणी केली जाते, तर अखेरीस (उत्तररंगात) वीररसातून दृष्टाचा नाश आणि सत्याचा जय दाखवून एक प्रबोधनाची भूमिका स्पष्ट केली जाते.

a group of people performing Aad Dashavtar on stage
दशावतारी नाटकाच्या पूर्वरंगतील (आड दशावतारातील) काही क्षण
Source: रात्र दशावताराची’s Facebook Page

दशावतारी नाटकात उत्तरार्धात जे चरित्र किंवा आख्यान निवडतात त्याची कथावस्तू ही भारतभरच्या जवळजवळ सर्वच लोकनाट्यांप्रमाणे पौराणिकच असते, व शक्यतो ही कथा रामायण-महाभारत या आर्षकाव्याच्या कथारूप अवतारातून निवडलेली असते. याशिवाय पांडवप्रताप, हरिविजय, नाथसंप्रदायातील कथा, कथाकल्पतरूतील कथा, क्वचित प्रसंगी इतर पुराणातील कथाही नाटकासाठी निवडतात. अलीकडे तर काल्पनिक कथांवर आधारित नाटके देखील सादर केली जातात. 

पूर्वरंगात (आड दशावतारात) प्रामुख्याने मालवणीचाच वापर केला जातो. ही बोली विशिष्ट हेल काढून बोलत असल्यामुळे लोकांना त्याची मौज वाटून विनोद निर्माण होतो. यातील पात्रांचे संवाद फारच मजेशीर असतात. विनोदातून प्रबोधन असे काहीसे स्वरूप येथे पाहायला मिळते. उत्तररंगातील राजा, देवदेवता, ऋषीमुनी यांची भाषा प्रौढ असते. कित्येक दशावतारी संस्कृत सुभाषितांचा वापर करताना दिसतात पण या आख्यानातून येणाऱ्या महार, चांभार, धनगर, कोळी, धोबी यांची दशावतारी नाटकाच्या उत्तररंगातील भाषा ही स्थानिक बोलीच असते.

दशावतारी नाटकाच्या उत्तररंगात गद्य भाषणाशिवाय काही पात्रे गीतेही म्हणतात. सबंध दशावतारी नाटकात या गाण्यांची संख्या जेमतेम ८-१० असते. नाटकातील पात्रे आजच्या पौराणिक नाटकातील पात्रांप्रमाणे स्वतःची गाणी स्वतःच गातात. गाणे गाताना आलप-तानाही मारल्या जातात. तसेच कित्येक गीतांना अभंग, पोवाडे यांच्याही चाली लावलेल्या दिसतात. क्वचित स्त्रीपात्राच्या गाण्यात भातलावणी गीत, जात्यावरच्या गाण्यांच्या चालीवर एखादे गीत असते. अलीकडच्या दशावतारी नाटकांच्या गाण्यात एखाद्या सिनेमातील प्रसिद्ध गाण्यावर आपल्या शब्दांचा साज चढवून त्या चालीवर गाणी म्हटली जातात पण ही दशावतारी गीतांची परंपरा म्हणता येणार नाही.

a group of people performing Dashavtar Langaar Nrutya
दत्तमाऊली दशावतार मंडळाच्या नाटकाच्या उत्तररंगातील (आख्यानातील) एक क्षण | Source: instagram.com/sanket_kudav_official

दशावतारी नाटक या शब्दात दशावतारातील पूर्वरंग व उत्तररंग अशा दोन्ही गोष्टी अपेक्षित आहेत. मात्र कोकणात तिथीच्या दशावतारी नाटकाला जत्रा, जात्रा किंवा दहीकाला असे म्हणतात. यातच पूर्वरंग आणि उत्तररंग दाखवला जातो व तिथीशिवाय जी दशावतारी नाटके केली जातात त्यांना खेळ, चरित्र, आख्यान किंवा दशावतारी नाटक असेच म्हटले जाते व यात पूर्वरंग न करता फक्त मुखवटा घातलेला गणपती रंगमंचावर आणून त्याची पदातून स्तुती करून त्याच्याकडून खेळासाठी आशीर्वाद मागून आख्यानाला सुरुवात केली जाते. दशावतारी नाटकाचा रंगमंच हा देवळातील सभागृह, सभामंडप किंवा देवळाच्या पुढचे पाटांगण क्वचित प्रसंगी मोकळ्या मैदानाचा वापर केला जातो. विशेषतः मशालींच्या, पेट्रोमॅक्सच्या किंवा विजेच्या प्रकाशात थंडीच्या मोसमात नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या आसपास दशावतारी नाटकांना सुरुवात होते. दहिकाल्याच्या जत्रांमध्ये मध्यरात्री नाटकाला सुरुवात होऊन ते पहाटेच्या झुंजूमुंजूपर्यंत चालू असते. अश्या जत्रांमध्ये तयारी करून कुटुंबासोबत जाणे, देवदर्शन करणे, लाईटीचा झगमगाट पाहत दुकानांमध्ये आपल्या आवडीच्या वस्तूंची खरेदी करणे आणि गुलाबी थंडीचा अनुभव करत दशावतारी नाटकाचा आनंद लुटण्याची मजा काही वेगळचीच असते.

दशावतारी आख्यानांचा उद्देश हा ईश्वर संकीर्तनाचा अर्थात भागवतधर्म प्रसाराचाच आहे. त्यासाठी दशावतारी सुद्धा आपल्या साध्याभोळ्या कोंकणी प्रेक्षकांना सोप्या भाषणातून, अभिनयातून, संगीतातून व नृत्यातून रामायण-महाभारतातील कथा समजावून सांगतात व मनोरंजनबरोबर शेवटी समाज प्रबोधनाचे कार्यही साधतात. कोकणात धर्म, नीती, भक्ती, मोक्ष यांचे शिक्षण देणाऱ्या संस्थात दशावतारी नाटकांचा फार मोठा वाटा आहे.

आड दशावतारातील संकासुर

आड दशावतारात ब्रह्मदेवाचे वेद चोरण्यासाठी आलेला संकसुर
आड दशावतारात ब्रह्मदेवाचे वेद चोरण्यासाठी आलेला संकसुर
Source: www.youtube.com

परंपरागत प्राचीन आडदशावतारात (हाच खरा दशावतार) नाईक, गणपती, रिद्धि-सिद्धि, भटजी, सरस्वती (मोर), दोन टाळेकरी (द्वारपाल), ब्रम्हदेव, संकसुर, विष्णू, माधवी, दोन गौळणी, बसवा अशी पात्रे येत. व त्यानंतर हरीच्या पहिल्या आठ अवतारांची मुख्य पात्रे येऊन दशावतार करीत. आज पूर्वरंग (आड दशावतार) केला जातो त्यात गणपती, रिद्धि-सिद्धीतील एकच पात्र, सरस्वती, ब्रम्हदेव, संकासुर, विष्णु एवढीच पात्रे दाखवून आड दशावतार आटोपता घेतला जातो. प्राचीन परंपरेशी दुवा सांगणारे शिव-पार्वतीचे बसवानृत्य तर आता कालबाह्य झाले आहे. नाटकातील पूर्वरंगात (आड दशावतारात) “संकासुर” या व्यक्तिरेखेला मूळ नायकापेक्षा जास्त महत्व असून विदूषकत्व आणि असुरत्व याची सरमिसळ त्यात झालेली दिसते. त्यामुळे दशावतारी नाटकाचे संकासुर हे फार मोठे आकर्षण ठरते. कोंकणी जीवनाचे व मालवणी-कुडाळी बोलीभाषेचे विविध नमुने त्याच्या संवादातून व्यक्त होतात. म्हणून कोंकणी परिसराचे व संस्कृतीचे तो प्रतिनिधित्व करतो.

काळानुसार दशावतारातील अमूलाग्र बदल

आज दशावतार कला चांगलीच लोकपसंतीस उतरलेली दिसते. पूर्वीच जे पारंपारिक दशावतार होत ते फार वेगळ होतं. त्यावेळी कलाकार गावोगावी पायी प्रवास करत तसेच आपलं सामान स्वतः वाहून नेत असत. रंगभूषेसाठी लागणारे रंग देखील नैसर्गिक साधन संपत्तीतून प्राप्त करत असत. जसे की नदीतील रंगीबेरंगी दगड शोधून त्यांच क्षपण घडवून आणणे म्हणजे झीजवून ते रंग वापरणे, कौलापासून रंग बनवून वापरणे किंवा शेड यांसारखे रंग वापरत. रंगपटात (मेकअप रूममध्ये) तयारी करण्यासाठी गॅस बत्तीचा वापर होत असे. नाट्यप्रयोग देखील गॅसबत्तीच्याच प्रकाशात सादर केला जाई. वेंगुर्ल्यातील श्री देव मानसीश्वराची जत्रा सोडल्यास आज हे चित्र आपल्याला पहावयास मिळत नाही. आजही या जत्रेला दशावतारी नाटक हे पेट्रोमॅक्सच्या बत्तीच्या उजेडात सादर केले जाते.

a group of people performing Dashavtar on a stage in Manseeshwar Jatra Vengurla
वेंगुर्ल्यातील श्रीदेव मानसीश्वराच्या जात्रेत पेट्रोमॅक्सच्या उजेडात सादर केलेला दशावतार | Source: https://ruralindiaonline.org

हल्लीच्या दशावतारामध्ये आधुनिक काळानुसार बदल होत गेलेले आपण पाहतो. जसे की, रंगभूषा-वेशभूषा यांसाठी लागणारे भरजरी शृंगार साहित्य दुकानांमध्ये सहज उपलब्ध होते. नाटकाच्या ठिकाणी स्वतःच्या गाडीने सहज जाता येते, रंगपटात व रंगमंचावर लाईटचा झगमगाट आणि उत्तम साऊंड सिस्टम असे बदल दिसून येतात यावरून आपल्या लक्षात येते की आपल्या दशावतारी कलेने आणि कलाकारांनी किती समृद्ध आणि लक्षवेधी वाटचाल केली आहे.

समस्या अनेक उपायांच काय ?

आजच्या या आधुनिक काळात दशावतार लोककला फक्त लोकाश्रयावर चालत आहे. आणि या आपल्या कलेला जर का आपल्याला टिकवायचं असेल तर आपण ती फक्त जोपासून चालणार नाही तर कलाकाराच्या आर्थिक साक्षमतेकडेही लक्ष देणे अत्यंत महत्वाचे आहे. आज आपण पाहतो की सारं जग तंत्रज्ञानाच्या दिशेने पळत आहे. मोबाईलमुळे सर्वांनाच घरबसल्या बोटाच्या क्लीकवर देशातीलच नव्हे तर जगातील मनोरंजनाचे दालन खुले झाले आहे. पण असं असताना देखील दशावतारी नाटकांना रसिकांचा प्रेमळ प्रतिसाद लाभणे हे अतिशय भाग्यदायी आहे. त्यामुळे या कलेकडे फक्त आवड म्हणून न पाहता यातून यशस्वी करियरची संधी कशी उपलब्ध होईल याचा व्यवस्थित विचार करणे आवश्यक आहे.

आपल्या या कलेला टिकवणारे कित्येक जेष्ठ श्रेष्ठ कलाकार पूर्वीही आणि आजदेखील दयनीय परिस्थिती जगत आहेत. बऱ्याच जणांनी कलेसाठी आपल्या घरादारावर, संसारावर तुळशीपत्र ठेवले परंतु कलेची साथ सोडली नाही. कोणतीही लोककला टिकते ती त्या कलेसाठी अहोरात्र झटणाऱ्या कलाकारांमुळे आणि जर कलाकरांची आर्थिक गणितं विस्कटत असतील तर कला वृद्धिंगत होऊ शकत नाही.

a man (Dashavtar Artist) sitting on the floor with a light bulb and think about his poor conditions
डोक्यावर असंख्य चिंता आणि जबाबदारीच ओझ घेऊन लोकांचे निखळ मनोरंजन करणारा एक दशावतारी कलाकार | Source: https://ruralindiaonline.org

बरेचदा कोणत्याही गोष्टीच्या विकासाच्या दृष्टीने विचार करताना त्यातील समस्यांवर खूप बोललं जातं परंतु उपायांवर चर्चा क्वचितच होते. त्यामुळे उपायांची अमलबजावणी तर लांबच राहिली. ही वेबसाइट सुरू करण्याचा उद्देशच हा आहे की आपण सर्व दशावतार कलाप्रेमी मिळून या कलेला आणि कलाकारांना अधिकाधिक समृद्ध कसे करता येईल?! याचा विचार करणे व दशावताराची महती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवणे. जर हे साध्य करण्यात आपण यशस्वी झालो तर इंजीनियर, डॉक्टर प्रमाणे दशावतारातही करियर करू पाहणाऱ्या युवा पिढीला घरातून कोणत्याही प्रकारचा विरोध सहन करावा लागणार नाही. आणि तेव्हाच आपल्याला छाती ठोकून सांगता येईल की दशावताराला चांगले दिवस आले आहेत.

आज आपल्या महाराष्ट्राचं नाव उंचावत आहे त्यामध्ये दशावतारी कलेचे स्थान अतुलनीय आहे, आणि हे अतुलनीय स्थान टिकवून ठेवून त्यात समृद्ध बदल करत राहणं हे युवा वर्गाच कर्तव्य आहे.

“दशावतार कला कोकणची शान,
कलाकारांमुळे सदैव उंचावते दशावतारी कलेची मान”

– दिक्षा दिनेश मराळ

दशावतारातील सर्वच कलाकारांना माझा मनाचा मुजरा !

शब्दांकन: कु. दिक्षा दिनेश मराळ

संदर्भ: दशावतार (लेखक: डॉ. अशोक भाईडकर)

5 thoughts on “दशावतार: कोकणची एक समृद्ध लोककला”

  1. खूप सुंदर वैभव जी आपल्याला या प्रवासात उत्तम गती मिळो हीच गणपती चरणी प्रार्थना 🙏🙏

  2. कलाकारांची माहिती दिली तर छान होईल

  3. श्रीमान वैभव खानोलकरजी आपलं “वैभव दशावताराचे” ह्या पहिल्या वेबसाईटची निर्मिती केल्या बद्धलं आपलं अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा

  4. पुढे अजून खूप लेख येणार आहेत….त्यामुळे चिंता नसावी🙏😊 आपल्या अनोमल सल्ल्याबद्दल धन्यवाद

Leave a Comment

error: Error 404