दशावतारी नाटकाची ०५ खास वैशिष्टे: समृद्ध लोककलेचा अद्भुत प्रवास

a group of artist from Khanolkar Dashavtar Natya Mandal, Khanoli performing Dashavtari Natak on stage
खानोलकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळाच्या “राजयक्ष्मा” या नाटकातील एक क्षण | Source: रात्र दशावताराची Facebook Page

कुठलीही लोकनाट्य परंपरा ही अलिखित असते. ज्या प्रदेशातील ती लोककला असते त्या प्रदेशातील लोकांना तेथील कलावंतांना ती सादर करताना पाठांतर करण्याची गरज भासत नाही. पाठांतराची गरज त्यांच्याकरिता ज्यांच्याकडे कला परंपरेने चालत आलेली नसते. याउलट कोकणातील अशिक्षित दशावतारी कलावंत सुद्धा कुठल्याही दशावतारी नाटकातल्या भूमिकेत न अडखळता अस्खलितपणे बोलू शकतो त्याला कुठल्याही संवादाच्या लिखित सहिंतेची गरज भासत नाही कारण त्याला हे ज्ञान परंपरेने प्राप्त झालेले असते.

आजही तळ कोकणात वेंगुर्ल्याच्या आजूबाजूच्या परिसरात शुद्ध स्वरूपात दशावतारी नाटके केली जातात. हा खेळ पूर्वरंगात आणि उत्तररंगात (दोन भागात) सादर केला जातो. वारकरी सांप्रदायातील भजन, कीर्तन आणि नारदीय कीर्तन जसे रंगवले जाते व त्यातून ईश्वराची उपासना व प्रार्थना केली जाते त्याप्रमाणे दशावतारी नाटकातही दृष्टांचा संहार आणि सत्याचा जय दाखवून ईश्वराची उपासना केली जाते.

कोकणातील तिथीच्या जत्रांमधील दशावताराचे स्वरूप:

पूर्वरंग (आड दशावतार):

Scenes from Aad Dashavatar
कोकणातल्या दहिकाल्याच्या जत्रांमध्ये सादर होणाऱ्या आड दशावतारातील काही दृश्ये | Source: रात्र दशावताराची Facebook Page

तात्पुरत्या रंगपटात रात्री बारा-साडेबाराच्या सुमारास घुमाळ वाजवतात. नंतर मृदुंगी (मृदुंग वाजवणारा), झांजवाला (यातील एक नाईक) तात्पुरते रंगमंचावर येतात आणि रंगमंचावर असलेल्या बाकावर बसून पूर्वरंग (आड दशावतार) सुरू करतात.

  1. पूर्वरंगात प्रथम गणपती स्तवन तसेच वेगवेगळ्या देवांची स्तुती असलेली गीते, पदे म्हटली जातात.
  2. धोतरासारखा कपडा आडवा धरून मुखवटा घातलेल्या गणपतीचे रिद्धी-सिद्धीच्या सह आगमन होते. त्यानंतर रिद्धी सिद्धीचे नृत्य असते. (गणपती काही बोलत नाही, नाईकच गणपतीचा आशीर्वाद गाण्यातून सांगतो.)
  3. भटजीचा प्रवेश व त्याची पूजा.
  4. कमरेला लाकडी मोराचा मुखवटा बांधलेल्या ब्रह्मकुमारी सरस्वती देवीचे मोरावर बसून आगमन व तिचे नृत्य. (हे नृत्य थांबून थांबून केले जाते.)
  5. ध्यानस्थ बसलेल्या ब्रम्हदेवाचा प्रवेश. (पूर्वी चार तोंडाचा लाकडी मुखवटा घातलेला ब्रह्मदेव यायचा आता फक्त पांढऱ्याशुभ्र दाढी मिशीवाला ब्रह्मदेव येतो.)
  6. ब्रम्हदेवाचे वेद पळवण्यासाठी आलेल्या संकासुराचा प्रवेश.
  7. शेवटी श्रीविष्णूचा प्रवेश आणि संकासुर वधाने पूर्वरंग (आड दशावतार) संपतो.

उत्तररंग (मुख्य आख्यान):

  1. उत्तररंगात रामायण, महाभारत, भागवत, पांडवप्रताप इत्यादी ग्रंथातील एखादे आख्यान करतात. उत्तररंगात कोणते नाटक हवे आहे हे बहुतेकदा त्या त्या ठिकाणचे ग्रामस्थ ठरवतात आणि त्यानुसार मंडळातील सर्व कलाकार एकत्रित चर्चा करून, पात्रे वाटून नाटक सादर करतात.
  2. कोकणात तिथीची जत्रा नसते त्यावेळी संपूर्ण पूर्वरंग न दाखवता रिद्धी-सिद्धी शिवाय फक्त लाकडी मुखवटा घातलेला गणपती दाखवला जातो व पुढे रामायण, महाभारत इत्यादी ग्रंथातील पौराणिक चरित्र सादर केले जाते.

दशावतारी नाटकाची ०५ खास वैशिष्टे पुढीलप्रमाणे:

१. दशावतारी जत्रा

कोकणात सुगीच्या हंगामानंतर लगेचच दशावतारी जत्रेचा हंगाम सुरू होतो. म्हणजेच दिवाळीनंतर हा हंगाम सुरू होतो. जवळजवळ सर्वच दशावतारी मंडळांच्या जत्रा एकदम म्हणजेच कार्तिक शुद्ध प्रतिपदेच्या आसपास सुरू होतात.

अ. क्र.दशावतार मंडळाचे नावदेवस्थानाचे नावतिथी
वालावलकर दशावतार नाट्य मंडळलक्ष्मी नारायण – वालावलकार्तिक शुद्ध एकादशी
मामा मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळगिरोबा – मोचेमाड, वेंगुर्लेकार्तिक शुद्ध नवमी
खानोलकर दशावतार नाट्य मंडळविठोबा – आवळेगाव, वेंगुर्लेकार्तिक शुद्ध एकादशी
आजगावकर दशावतार नाट्य मंडळवेतोबा – आजगाव, वेंगुर्ले कार्तिक पौर्णिमा
आरोलकर दशावतार नाट्य मंडळवेतोबा – आरवली, वेंगुर्लेकार्तिक पौर्णिमा
चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळपताळेश्वर – चेंदवण कार्तिक शुद्ध द्वादशी
पार्सेकर दशावतार नाट्य मंडळसातेरी – वेंगुर्लेकार्तिक पौर्णिमा
नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळश्रीदेव गिरोबा – वेंगुर्ले कार्तिक शुद्ध एकादशी

वरील दशावतारी मंडळींनी केलेल्या कार्यक्रमांवरून स्पष्ट होईल की दशावतारी नाटकाचा केंद्रबिंदू वेंगुर्ले असून कार्तिक शुद्ध नवमीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत म्हणजेच पाच-सहा दिवसातच सर्व दशावतारी मंडळे दशावतार करण्यास बाहेर पडतात. सर्व दशावतारी मंडळींना त्या त्या देवस्थानाची जत्रा करण्याची वर्षासने (ठरवून दिलेल्या वार्षिक जत्रा) असतात. त्या ठराविक तिथीला प्रत्येक दशावतारी मालक आपले मंडळ नेऊन त्या त्या देवासमोर दशावतार सादर करतो त्याला वर्षासने किंवा वार्षिक जत्रा असे म्हणतात. फक्त जत्रेतच आड दशावतार (पूर्वरंग) दाखवण्यात येतो.

कोकणातील दहिकाल्याच्या जत्रांमधली काही दृश्ये|Source: रात्र दशावतराची Facebook Page

याशिवाय ज्या देवाचा उत्सव असेल त्याची पालखी निघते. त्यावेळी म्हारांनी (महार जातीच्या मानकरी लोकांनी) वाजवलेले ढोल, ताशे, सनई इत्यादि वाद्ये श्रवणीय असतात. तसेच देवस्थानाचे मानकरी देवाच्या पालखीला खांदा लावतात. टाळ मृदुंगाच्या गजरात प्रदक्षिणा सुरू झाली की अनेक गायक भजने गातात, आरत्या म्हणतात. कित्येक वेळा प्रथेनुसार मंगलाष्टके म्हणून देवांची लग्नही लावली जातात. बऱ्याच ठिकाणी देवाची वारी (अवसार) उभी राहतात व अनेक मानकरी, गावकरी व देवस्थानची ख्याती ऐकून इतर प्रदेशातून आलेले लोक देवाला पडस्थळं घालून आपापल्या शंकांचे निरसन करून घेतात.

कोंकणी माणूस आजही अत्यंत आवडीने गावच्या या जत्रांमध्ये (दहिकाल्यामध्ये) दशावतार पाहायला येतो. यामध्ये गावातील बायका व लहान मुलांचा समावेश जास्त असतो. आजच्या या रील्सच्या जमान्यात दशावतारी नाटकांना तरुणांचा मिळणारा प्रतिसाद खरंच कौतुकास्पद आहे. सती-सावित्री, नल-दमयंती, सीता हरण, राजा हरिश्चंद्र-तारामती सारख्या नाटकातील करुणामय दृश्य पाहून कित्येकदा हजारोंनी प्रेक्षक रडताना दिसतात. इतके ते दशावतारी नाटकाशी एकरूप होतात. भस्मासुर, दुर्योधन, बकासुर, रावण, कुंभकर्ण यांच्या थयथयाटाने आणि भयानक रूपाने लहान मुलांची तर भीतीने बोबडी वळते. एवढी उत्कृष्ट दृश्य दशावतारात सादर करतात.

ज्या गावची जत्रा असेल त्या गावातील घरे जत्रे दिवशी अनेक पावणे व नातेवाईक मंडळींनी भरून जातात. त्यांच्या आदर सत्कारासाठी घरोघरी वडे-सागोतीचा बेत केला जातो. घरामध्ये सर्वांची चलपहल असल्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. व वर्षातून एकदा या जत्रांच्या निमित्ताने कोंकणी रसिक आनंदात हसताना, खिदळताना दिसतो.

२. दशावतारी नाटक (मुख्य आख्यान)

प्रत्येक दशावतारी मंडळाला काही मोजकीच वर्षासने (जत्रा) वाट्याला येतात व जत्रेचा हंगाम २-३ महिनेच चालतो. कार्तिक मार्गशीर्ष व पौष या महिन्यात प्रत्येक गावाच्या वार्षिक जत्रा जवळजवळ संपतात व त्यानंतर दशावतारी नाटकांना (व्यावसायिक नाटकांना) सुरुवात होते. दहिकाल्याच्या जत्रेप्रमाणे या नाटकांना तिथी, वार काही नसतो. उलट दशावतारी कंपनीचा मालक आपल्या सवडीप्रमाणे ग्रामस्थांना तारीख देतो. दहिकाल्याच्या जत्रा जशा ठराविक नाटक मंडळीच्या वाट्याला येतात तसे या नाटकांना बंधन नसते. गावातील नाटकप्रेमी आपल्या आवडीच्या मंडळास आमंत्रण देतात व बहुतेकदा कोणते आख्यान हवे आहे हे देखील ग्रामस्थच ठरवतात. ही नाटके खुल्या मैदानात किंवा देवळाच्या बाजूला रंगमंच उभा करून तेथे सादर करतात.

Artist from Kaleshwar Dashavatar Natya Mandal, Nerur Kudal performing Langaar Nritya a very famous part of Dashavatari Natak.
सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाच्या नाटकातील लढाईचा एक क्षण

ब्लॉगच्या सुरुवातीस सांगितल्यानुसार या नाटकात आड दशावतार (म्हणजेच दशावताराचा पूर्वरंग) करत नाहीत तर एकदम चरित्राला किंवा आख्यानाला सुरुवात होते. फक्त चरित्र किंवा आख्यान सुरू होण्यापूर्वी मुखवटा घातलेला गणपती प्रत्यक्ष रंगमंचावर आणून गणेश स्तवन व आरती म्हटली जाते. आरती संपल्यावर गणपती निघून जातो त्यानंतर ठुमरी गायली जाते. ठुमरी संपल्यावर हार्मोनियमवाला व तबलजी एका विशिष्ट संथ धीम्या चालीवर धुमाळ वाजवतात व त्याच्या तालात पाय टाकत राजपात्र, राक्षसपात्र किंवा प्रमुख पात्र रंगमंचावर प्रवेश करते आणि आपल्या सुरुवातीच्या निवेदन वजा भाषणात अप्रत्यक्ष रीतीने आज कुठले आख्यान दाखवण्यात येणार आहे? मी कोण? मी येथे का आलो आहे? याची माहिती रसिक प्रेक्षकांना दिली जाते. सर्वच दशावतारी नाटकात प्रथम आलेले पात्र आपला इतिहास सांगणारे भाषण करीत असते. यालाच दशावतारी भाषेत स्वगत किंवा निती असे म्हणतात. नाटकाच्या दृष्टीने हे स्वगत अत्यंत महत्वाचे असते.

सौ. अवनी आनंद राऊळ यांनी अभंग Records आयोजित सर्वोत्कृष्ट दशावतार निती स्पर्धेसाठी लिहिलेले प्रथम क्रमांकाचे श्रीकृष्ण शिष्टाईला जाताना थांबवणाऱ्या यज्ञसेनी द्रौपदीचे स्वागत/ निती

वरील स्वगताचा/ नीतीचा नमूना हा दशावतारातील युवा पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी अभंग Records तर्फे भरवण्यात आलेल्या स्पर्धेतील आहे. १४ फेब्रुवारी २०२४ रोजी सर्वोत्कृष्ट दशावतार निती या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये स्पर्धकाने अभ्यासपूर्वक स्वलिखित स्वगत लिहिणे अपेक्षित होते. या स्पर्धेचे परीक्षण नटवर्य श्री. लक्ष्मण (पप्पू) नांदोसकर यांनी केले होते व या स्पर्धेत सौ. अवनी आनंद राऊळ यांच्या द्रौपदीच्या स्वगताने प्रथम क्रमांकाचा सन्मान पटकावला होता.

३. दशावताराचो पेटारो

दशावतारात वेळाच्या म्हणजेच बांबूच्या पातळ असलेल्या काठ्यांपासून तयार केलेल्या पेटीला पेटारो असे म्हणतात. हा पेटारा साधारणपणे अडीच ते तीन फूट लांब आणि दीड ते दोन फूट उंच असा बनवलेला असतो. त्याला वरून तशाच प्रकारचे चार ते सहा इंच उंचीचे झाकण असते. दशावतारी नाटकात या पेटार्‍याला फार महत्त्व असून हा पेटारा खूप पवित्र मानला जातो. दोन अडीचशे वर्षांपूर्वी ज्यावेळी पत्राच्या पेट्यांचा शोध लागलेला नव्हता तेव्हा सर्वच दशावतारी बांबूच्या छोट्या छोट्या तासलेल्या वेळापासून बनवलेल्या पेट्याच वापरत असत. घरातही सामान ठेवण्यासाठी किंवा धान्य साठवून ठेवण्यासाठी असे पेटारे वापरत असत. आणि म्हणून परंपरेचे प्रतीक म्हणून अजूनही सर्व दशावतारी मंडळे एक तरी वेळाच्या लाकडापासून बनवलेली पेटी/ पेटारा ठेवतात.

This is a basket made of Bamboo called Dashavatari Petaro.
दशावताराचो पेटारो | Source: रात्र दशावताराची Facebook Page

ही एक दशावतारी नाटकाची प्राचीन परंपरा सांगणारी वेळाची आयताकृती पेटी असून त्यात गणपती, मोर हे मुखवटे असतात शिवाय गदा, तलवार, बाहुभुजा, फुलांच्या व रुद्राक्षांच्या माळा, बाहुली, लाकडी सर्प इत्यादी साहित्य असते. दशावतारी नाटकांचा हंगाम संपून पावसाळ्याला सुरुवात झाली की हा पेटारा त्या त्या दशावतारी मंडळांच्या मालकांच्या घरी ठेवतात. व पुढील हंगामामध्ये पेटाऱ्याची पूजा करून दशावतारी खेळांना सुरुवात करतात. दशावतारी मंडळी देवळातील देवा इतकंच या पेटाऱ्याला पूजताना दिसतात.

जत्रा किंवा दशावतारी नाटक सुरू होण्यापूर्वी पेटारा उघडून त्यातील गणपतीचा मुखवटा उभा करून इतर साहित्य व्यवस्थित लावून त्याची पूजा केली जाते. दशावतारी रंगायला बसण्यापूर्वी आणि रंगमंचावर जाण्यापूर्वी त्या पेटार्‍याला भक्तिभावाने नमस्कार करतात जणू काय तो पेटारा म्हणजे त्यांच्याबरोबर फिरणाऱ्या चौदा विद्या व चौसष्ट कलांच्या अधिपतिचे म्हणजेच गणेशाचे मंदिरच असते. पेटार्‍यातील गजाननामुळे आम्ही रंगमंचावर एवढे चांगले बोलू शकतो अशी सर्वच दशावतारी कलावंतांची भावना असते. या पेटार्‍यासमोर सबंध रात्रभर एक समय (समई) तेवत ठेवावी लागते. व्यावसायिक नाटक कंपन्यात जसे प्रयोग सुरू होण्यापूर्वी नटराजाची पूजा करतात त्याप्रमाणे दशावतारी कलाकार गणपतीसह पेटाऱ्याची पूजा करतात.

४. दिग्दर्शन

दशावतारी नाटकाला दिग्दर्शक असा कोणीच नसतो. प्रत्येक जण आपापल्या कुवतीप्रमाणे आपल्याला जमेल तसा अभिनय करतो हे जरी खरे असले तरी त्या दशावतार मंडळातला जेष्ठ आणि माहितीगार दशावतारी कलाकार नकळत दिग्दर्शनाचे काम करत असतो. कुठले नवीन आख्यान करायचे असल्यास रात्री जेवल्यानंतर सर्व दशावतारी एकत्र जमतात व या बैठकीत विचार विनिमय सुरू होतो. त्यावेळी जो जेष्ठ दशावतारी असतो तो त्या आख्यानची संपूर्ण गोष्ट सर्व इतर कलाकारांना सांगतो आणि एकदा ती सर्व गोष्ट सर्वांना समजली की तो पात्रांची विभागणी करतो. त्यानंतर सर्व दशावताऱ्यांना त्यांच्या त्यांच्या भूमिका समजावून सांगतो कोणी कधी रंगमंचावर जायचे याची माहिती देतो.

नाटकापूर्वी होणाऱ्या बैठकीतील काही क्षण | Source: माझा सिंधुदुर्ग YouTube Channel

एवढं झाल्यानंतर सर्व पात्रे मनातल्या मनात आपली भूमिका कशी रंगवायची याचा विचार करतात. त्यानंतर ज्याला प्रथम रंगमंचावर जायचे असते तो कलाकार उठून आपली रंगभूषा व वेशभूषा उरकून तयार होतो. मग हळूहळू बाकीचे कलाकार उठून रंगायला बसतात. अशावेळी केवळ ज्ञात असलेल्या कथेच्या आधारे आणि जेष्ठ दशावताऱ्याने सांगितल्याप्रमाणे कृती करून उत्तमरीत्या नाटक सादर केले जाते.

५. रंगभूषा व वेशभूषा

पूर्वी ज्यावेळी रंगांचा शोध लागला नव्हता त्यावेळी निसर्गात जे रंग उपलब्ध होते तेच रंग दशावतारी रंगभूषेसाठी वापरत असत. पूर्वी दगड घासून किंवा कुटून लाल-गुलाबी रंग बनवत व कोळसा झरवून काळा रंग बनवीत. कित्येक वेळा नैसर्गिक काजळही तयार करून त्याचा रंग म्हणून वापर करीत. त्याशिवाय हळद, खडू, चिवडी, हरताळ या नैसर्गिक रंगांचा वापर करीत आणि खोबरेल तेलात हे रंग कालवून ते तोंडावर थापले जात असत.

रंगपटात स्वतःचा मेकप स्वतः करणारे दशावतारी कलावंत | Source: रात्र दशावताराची Facebook Page

आजकाल सर्वत्र बाजारात मिळणाऱ्या अनेक छटा असलेल्या कृत्रिम रंगांचा वापर केला जातो. दशावताराची रंगभूषा एक विशिष्ट प्रकारे केली जाते. दशावतारी कलावंत रंगायला बसण्यापूर्वी पांढऱ्या रंगाचे एक बोट मस्तकाला लावून मग संपूर्ण चेहऱ्याला रंगकाम करायला सुरुवात करतात. पात्राच्या स्वभावाप्रमाणे भुवया लहान मोठ्या केल्या जातात. राजपात्राने किंवा राक्षस पात्राने आपल्या मस्तकावर विशिष्ट प्रकारे काढलेला नाम अतिशय पाहण्यासारखा असतो. पात्राच्या स्वभावाप्रमाणे, वयोमानाप्रमाणे व गुणधर्माप्रमाणे कलाकार रंगभूषा स्वतःच करीत असतात. राक्षस व खलनायक यांची रंगभूषा जास्त भडक असते.

पूर्वी दशावतारी नाटकात विविध मुखवटे वापरत असत. आड दशावतारातही (पूर्वरंगात) मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह या अवतारांचे मुखवटे असल्याची माहिती मिळते. १९ व्या शतकाच्या सुरुवातीला रावणाचा नऊ शिरांचा, ब्रह्मदेवाचा चार शिरांचा, कुंभकर्णाचा प्रचंड मुखवटा, शिवाय त्रिशीरा, शुर्पणखा, भुतेखेते यांचे मुखवटे दशावतारी नाटकात सर्रास वापरत असत. प्राण्यांच्या मुखवट्यात वाघ, हरिण, घोडा यांचे मुखवटे असत. अलीकडे पुष्कळ प्रमाणात कृत्रिम रंगांचा वापर केला जात असल्यामुळे मुखवट्या ऐवजी चेहऱ्यावर त्या पात्राला साजेशी रंगभूषा केली जाते. म्हणून हळूहळू नाटकात मुखवटाचा वापर कमी झाला आहे.

दशावतारी नाटकातील सध्याच्या कलाकारांची रंगभूषा आणि वेशभूषा
भूमिकेला साजेशी अशी दर्जेदार वेशभुषा केलेले आत्ताचे दशावतारी कलावंत | Source: रात्र दशावताराची Facebook Page

रंगभूषेप्रमाणेच आजच्या दशावतारी कलावंतांची वेशभूषाही बघण्यासारखी आहे. पूर्वी बऱ्याच गोष्टींच्या अभावामुळे अत्यंत साध्या पद्धतीची वेशभूषा केली जात होती. वेशभूषेपेक्षा कलाकाराच्या उत्तम अभिनयावर आणि संवाद फेकीवर पूर्वीची नाटके रंगत असतं. परंतु आता अभिनयाबरोबरच कलाकारांची वेशभूषा ही दर्जेदार असते.

संदर्भ: दशावतार (लेखक: डॉ अशोक भाईडकर)

2 thoughts on “दशावतारी नाटकाची ०५ खास वैशिष्टे: समृद्ध लोककलेचा अद्भुत प्रवास”

  1. अत्यंत सुंदर माहिती दिली. नवीन पिढीला या माहितीचा उपयोग होईल.

Leave a Comment

error: Error 404